"आत्मार्पण तव विस्मित करते, जीवन धन्य नि मृत्यु महान"
सूर्यकुलात जन्म घेणा-या प्रत्येक तेजस्वी वीरपुत्राचं जीवन अंगाराच्या कणासारखं धगधगतं, जळत असतं - संकटांनी भरलेलं असतं.
वासुदेव बळवंत फडके. असाच एक धगधगता अग्निकण. एडनच्या तुरूंगात त्यांनी हौतात्म्य पत्करलं.
पण क्रांतीची ज्योत कधी विझते का? एका ज्योतीनं दुसरी ज्योत लागते. एक अखंड परंपरा, तेजस्वी, दिव्य परंपरा आहे ही.
वासुदेव बळवंत फडके गेले आणि तीनच महिन्यांनी विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला. सूर्यकुलात एक नवी ठिणगी प्रकाशू लागली... धगधगू लागली. दैवाशी लढू लागली.
जो वंश जोडतो सूर्यकुलाशी नाते
त्या वेलीच्या फुलाफुलाला दैवाशी लढणे असते!ध्रु.
जीवनयज्ञाची ज्वाळा क्षणात भिडते आभाळा
स्वये होउनी पवित्र समिधा अग्नीते आलिंगन देते!१
रथचक्राते उद्धरिणे मृत्यूला प्रतिपल हसणे
शापित जीवन असले तरिही स्थण्डिलि अजुनी धगधगते!२
बुद्ध्या वरणे असिधाराव्रत इतिहासाची धरणे संगत
तडित् चमकुनी असंख्य नेत्रां - क्षणात दिपवुनि ती जाते!३
"क्रांतिवीर" हो जधि अस्तंगत दुसरा जन्मे होउन प्रेरित
परंपरा ही दिव्यत्वाची खंडित ना कधि होते!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
श्रीराम आठवले सरांच्या कवितांशी थोडी जुनी ओळख असल्याने या कवितेची जातकुळी लक्षात येते. सावरकरांच्या जन्माचे जे नाते सूर्यकूळाशी सांगितले आहे तेच नाते आठवले सरांच्या कवितांचे स्वातंत्र्यवीरांच्या कवितेशी असल्याची माझी भावना आहे. चतुरस्र लेखन करणार्या आठवले सरांना प्रसिद्धीचे, मानमरातबाचे वलय अधिक प्रमाणात मिळायला हवे होते असे वाटते.
ReplyDelete