Saturday, March 21, 2009

शांत झोपू दे भारतमाते.

संकटांचे झंझावात येत होते नी जात होते. पण सूर्यकुलातील वंशवेलीचं ते फूल अजून सतेज होते. मातृभूमी आणि मातृभूमीचं स्वातंत्र्य यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या महामानवाची महापूजा अजून तेजस्वी होती. सागर, आकाश आणि तेज यावर प्रेम करणारं ते महामानवाचं महान मन आता झुकलं होतं. झुकलं होत जमिनीकडे. धरणीमातेकडे..

महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या जीवनाची भैरवी स्वतः गात होते. आयुष्यातला प्रत्येक श्वास ज्या भारतमातेच्या स्मरणाने त्यांनी घेतला त्या आपल्या भारतमातेला ते विनवीत होते -

शांत झोपू दे भारतमाते

शिणली गात्रे, थकले मनही 
अधिक काहि गे सहवत नाही 
तव अंकावर परमवत्सले 
शांत झोपु दे भारतमाते। 
निजव निजव गे भारतमाते ।।१।। ।। ध्रु. ।।

नको अन्न मज नको उदकही 
विमल होऊ दे नश्वर तनुही 
ये मृत्यो। संकोच कशाला? 
घे हाती माझिया कराते ।।२।। 

आम्ही जातो अमुच्या गावा 
विनम्र वंदन सकला कळवा 
कृतज्ञतेने मन भारावे, 
घे कुशीत गे मज भारतमाते ।।३।।
 
नेत्रि पाहिला स्वतंत्र भारत 
ऐकतसे विजयाची नौबत 
खंडित भूमि अखंड होवो, 
हेच इच्छितो सिंधू-सरिते ।।४।। 

हे शरीर भारभूत कोणाते नच व्हावे
मीच स्वये आनंदे ब्रह्मांडी विलयावे 
धन्य मी, कृतार्थ मी, 
अपुलेसे गे कर मज माते ||५||

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

सातवे सोनेरी पान.


१९६५ भारत पाक संघर्षाचं ते तेजस्वी पर्व. भारतीय फौजांनी आगेकूच करायला प्रारंभ केला. भारताला कणखर नेतृत्वाचा अनुभव येऊ लागला. कोण हा नेता? लाल बहादुर शास्त्री, क्षणाक्षणांनी विजयी वार्ता येऊ लागल्या. स्वातंत्र्यवीरांचं क्षात्रतेजही उफाळून येऊ लागलं. भारतीय फौजेला त्यांनी आदेश दिला आणि आशीर्वादही दिला-

भारतभूच्या नरवीरांनो
यशवंत व्हा, जयवंत व्हा!ध्रु. 

युद्धाचे मिळतसे निमंत्रण
जयरणचंडी घुमु दे गर्जन
अर्ध्यावरती नकाच थांबू,
चंद्रगुप्त व्हा, नृसिंह व्‍हा!१

पापस्तानी भूमीवरती
झडू देत त्या विजय नौबती
विभाजनाचे पुसण्या लांछन
पर्वकाल पातला नवा!२

आज संचरे तनि वीरश्री
बहादुराची उजळ मुखश्री
कणखर नेतृत्वाचा अनुभव
पुन्हा भारता हवा हवा!३

काळ कौल दे माझ्या तत्त्वा
प्रताप करितो सार्थ सुतत्त्वा
पान सातवे हे सोनेरी,
लिहिण्यास्तव पेटे वणवा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

सोने माईचे झाले.

सोने माईचे झाले

त्या महाकाव्याचा आता अखेरचा सर्ग चालू होता. त्या महान ग्रंथाची पानं झपाझप उलटत होती... माई आजारी होत्या. कसलीशी चाहूल लागली... दाराजवळ पावलं वाजली... काळाची पावलं होती ती.

माई गेल्या... नंदादीप विझला.. तिचं सोनं झालं ।

वाजली काळाची पाउले 
सोने माईचे झाले!ध्रु.

स्वतंत्र भारत तिजला दिसला 
कधी नव्हे तो प्रपंच केला
अहेवपणिचे मरण सुदैवे, साध्वीते लाभले!१

जन्मभरीची सोबत केली
सुख-दुःखांशी समरस झाली
कुणीतरी पथि पुढती जाणे कधीच की ठरले!२

चंदनवाडी ते चंदन न्या 
अनंतास पोचवा सुकन्या 
श्रम कुठलेही मुळि न सोसवत, शरिर मम शिणले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

अंती मजला एक सांगणे.


१९६० मृत्युंजय दिनाचा समारंभ होता. त्या स्वातंत्र्यवीरांची वाणी ऐकायला पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो लोक जमले होते. सभेत ते म्हणाले –

मज सत्तेची तिळहि न इच्छा
ना शिवली चित्ता अभिलाषा!
परि निश्चये एक सांगतो - स्वतंत्र भारतभूचा पहिला राष्ट्रपती जर झालो असतो,
केल्या असत्या सीमा निश्चित!
पूर्वीच्या सरसीमा निजहृदि
पुनः पुन्हा आणुनिया सांप्रत
निर्जनभूची हिंदुभूमि मी, केली असती थोड्या अवधित!

माझ्या देशी प्रति युवकाला –
सैनिकि शिक्षण मिळले असते
विज्ञानाच्या महात्मतेने, ज्ञानविश्व हे विकसित होते!
द्या अवधी मज दोनच वर्षे
रशियाहुनही बलाढ्य माझा, देश आपणा करून दाखविन!  

कधीपासुनी विश्व असे हे
कधीच नाही बदलायाचे
जगता कळते सामर्थ्याची एकच भाषा
शस्त्रबळावर तोल सावरे विश्वशांतिची निर्मळ आशा!

मला जाणवे तुमचा प्रेमा !
हात जोडुनि परी विनवितो -
जीर्ण शरिरि या त्राण नसे हो -
मनोमनी मज भेटत जाहो!

अंती मजला एक सांगणे
शस्त्रबळा वाढवा - वाढवा
विज्ञानाच्या प्रयोगशाळा, प्रांतोप्राती असंख्य फुलवा
युद्धोत्सुक नवयुवका बनवा!
हिंदुराष्ट्र हे समर्थ घडवा, हिंदु राष्ट्र हे समर्थ घडवा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

रे हिन्दुधर्मा.


१९५६ साली पुण्यातील रमणबागेत भाषण करताना, धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे तत्त्व सावरकरांनी मांडले, राष्ट्राला धर्म अत्यावश्यक असल्याची जाणीव दिली. हिंदुधर्माला त्यांनी इशारा दिला -

हिंदुधर्मा रे खुळ्या, सहनशक्ती विसर रे
आण चित्ती क्रोध रे!ध्रु.

अन्याय कैसा साहशी?
सुस्त कैसा झोपशी?
धर्म बदले -राष्ट्र बदले, 
तत्त्व इतुके जाण रे!१

रात्र वैऱ्याची दिसे
सामर्थ्य तव कोठे असे?
बिंदु बिंदू मिळुनि सिंधू, हिंदुराष्ट्रा उभव रे!२

क्रोध म्हणजे जागृती
शांतवृत्ती सोड ती
मुर्दाडपण टाकून दे - प्रतिकारवृत्ती फुलव रे!३

धर्म जगता राष्ट्र राहे
धर्म तर इतिहास आहे
धर्माविना पृथ्वीवरी राष्ट्र क्षण ही नच उरे!४

शरिरि जैसा प्राणवायू
तुजमुळे वाढेल आयू
सामर्थ्य अन् संजीवनी तू, दिव्यता तव जाण रे!५


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

सिन्धु, तुला विसरु कसा?


अभिनव भारताचा सांगता समारंभ चालू होता. सावरकरांच्या कल्पनेनं भूतकालात झेप घेतली. साऱ्या प्राचीन गोष्टी त्यांना आठवल्या. वेदकाल आठवला.... आणि आठवली सिंधुसरिता. ऋषिवर्यांना वेदातील ऋचांची स्फूर्ती देणारी सिंधुसरिता; तपस्वी पुरुषांना तप करण्याचं सामर्थ्य देणारी सिंधुसरिता आणि पराक्रमी पुरुषांना पराक्रमाची प्रेरणा देणारी सिंधुसरिता. त्या आठवणींनी तो महर्षी, तो महातपस्वी – तो महापुरुष गहिवरला... त्यांच्या तोंडून पावन सिंधुमातेचं स्तोत्र स्फुरू लागलं... झरू लागलं... 

 

सुरसेविनी, विसरू कसा?
सिंधू, तुला विसरू कसा? ।। धुः ।।

स्नान प्रत्यही मी आचरिता
नाम सहज जिव्हाग्री येता
एक जाणवे तुज अंतरलो – हा जीव तत्क्षणी होत पिसा!१

अवघे जगत् जरि द्वेषिते
विसरू कसा तुज सिंधुते
तुजवीण हिंदू कधि संभवे का – उमटे मनी देवी ठसा!२

तुझ्याच काठी ऋषी मुनींनी
सुदर सूक्ते प्रेमे रचुनी
भक्तिभरे किति आळवली गे ऐशा तुला विसरू कसा?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

अग्निदिव्य.

गांधींच्या हत्येसंबंधीच्या खटल्यातून सावरकर निर्दोष, निष्कलंक सुटले. त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या पर्वातील ती जणू अग्निपरीक्षाच. सोन निकषाला उतरलं आणि अधिकच तेजानं झळकू लागलं.


सोने निकषाते उतरले, अधिकचि तेजे ते झळकले!ध्रु.

स्वतंत्र देशी नाहि वंदना
परि टळली ही मानखंडना
अग्निदिव्य हे फार अलौकिक, कुणि न जगि हे साहिले!१

भांडण असते जगि तत्त्वांचे
कधीहि नसते व्यक्ति व्यक्तिंचे
असंख्य अनुयायांनी मोदे, वीरा अभिवादिले!२

पतिव्रता त्या जानकीसही
अग्निपरीक्षा चुकली नाही
इथे विसरलो झाले गेले, भाव न कटु उरले!३

क्षमाशील हा उदार आत्मा
कृती ठरविते त्यास महात्मा
महामनाच्या चरणांवरती, पडुन धन्य होतील फुले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्य मिळालं. साऱ्यांना आनंद झाला. पण सावरकरांच्या भावना वेगळ्या होत्या.. त्यांच्या यातना, वेदना अगदी वेगळ्या होत्या.

ज्या स्वराज्यासाठी, ज्या स्वातंत्र्यासाठी आपण मृत्यूची पर्वा केली नाही - ते स्वातंत्र्य हेच का? स्वातंत्र्यलक्ष्मीच्या पूजनासाठी स्वतःची शिरकमलं अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं ते हेच का? स्वराज्य स्वप्नांच्या सुवर्णी शिखरासाठी ज्यांनी स्वतःला पायात गाडून घेतलं होतं त्यांचं स्वप्न हेच होतं का? नाही.. नाही.. अखंड भारत द्विखंड झाला नी त्यांचं स्वप्न भंगलं. म्हणून तर सावरकर उसळून म्हणाले

या स्वराज्यासाठी का रक्त आम्ही सांडले?
सर्वस्व अपुले वेचले! स्वप्न अमुचे भंगले!ध्रु.

मातृभू ही खंडिता
आज झाली वंचिता
बाल आम्ही सकल कसले, करित बसलो सोहळे?१

तत्त्वा न कोणी चिकटला
जो तो उताविळ जाहला
याचसाठी काय आम्हा ईश्वराने जगविले?२

हेच माझे देशबंधू
रागवूनी काय साधू?
शत्रू तर तडिपार गेला, काय कमि हे जाहले?३

जर्मनीचा कवि गटे
स्वप्नि वृत्ती रंगते
मी कवि, मग का न मानू? तोडले जे सांधते
स्वप्न नाही भंगले, आताच ते आरंभले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

सुखेनैव जा.

तीर्थरूप बाबा - तात्यांचे थोरले भाऊ इहलोकीची यात्रा संपवून चालले होते. मृत्यू ज्यांच्या जीवनाचा सोबती होता. मृत्यू म्हणजे सुंदर होणं अशी ज्यांची दृष्टी, असे बाबा सांगली येथे मृत्युशय्येवर होते. जो जीवनवीर मृत्यूला सामोरा चालला होता; त्यांना तात्‍यांनी पत्र पाठवलं ते असं
"या आपल्यासारख्या सतत साठ वर्ष लढत असलेल्या वीराची काया जो पडेल ती मानवी काया नव्हे तर देवाच्या हातच्या वज्राची एक महान दिव्‍य समीधाच होय” असे उद्गार काढून हात जोडून वंदन करीत तात्या पुढं म्हणाले –


तीर्थरूप बाबा, पुढती सुखेनैव जा
जीर्णकुडी त्यजुनी, सुंदर व्हावयास जा!ध्रु.

कृतज्ञता मानसि दाटे
धन्यताहि मोठी वाटे
आप्त स्वकिय पुनरपि दिसले, दुःख हो वजा!१

आव्हान कितीदा दिधले
मृत्यूला हसत खिजविले
मैत्रीस्तव त्याच्या हर्षे, योगिराज, जा!२

सुखदुःखे आली गेली
समवृत्ती चित्ती धरली
पद्मपत्र जीवन ठरले, स्थितप्रज्ञ, जा!३

क्रांतिध्वज हाती धरला
तो कधी न किंचित ढळला
जन्मभरी झुंजत होता, तृप्तकाम, जा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

याल तर तुमच्यासह.


स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झुंज देणारा तो झुंजार नेता होता. परकीयांच्या पोलादी पंजातून सुटल्यावर त्या उतारवयातही - त्यांनी स्वातंत्र्याची वाटचाल प्राणपणानं चालूच ठेवली. भारतीय स्वातंत्र्यासाठी साऱ्यांनी एक झालं पाहिजे अस त्यांचं मत होतं. आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गात अडथळा तर त्यांना कधीच परवडणारा नव्हता. अशा विरोधकांना त्या जयिष्णु नेत्यानं बजावलं –

याल तरी तुम्हांते घेउन,
न याल तर तुमच्याही वाचुन
विरोधाल तर बाजुस सारून पुढती पुढती जायाचे, स्वराज्य जिंकुन घ्यायाचे ।।१।। ।। ध्रु.।।

हिंदुसंघटन मंत्र आमुचा
रात्रंदिन तो जपावयाचा
सैनिकि शिक्षण घेताना पाउल दृढ रोवायाचे!२

नीलनभी हा राही फडकत
कुंडलिनी नि कृपाण शोभत
रक्तांकित ध्वजराजा वंदित समर लढू स्वातंत्र्याचे!३

आत्मविस्मृती तुम्हा जाहली
म्हणुनि हिंदुभू दुरावलेली
पतितांनो जोडाच अंजली नसानसातुन तुमच्याही हो रक्त खेळते हिंदूंचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

खड्गहस्त व्हा.


१९४२ - ४६ चा काळ होता. दुसरं महायुद्ध चालू होतं. स्वातंत्र्यवीरांनी भारतीय तरुणांना तेजस्वी आदेश दिला. क्षात्रतेज उजळून काढणारी ती चळवळ होती. मातृभूमीला समर्थ करण्यासाठी खड्गहस्त होण्याचा संदेश त्यांनी दिला

आली संधी, घेणे आधी,
सैन्यात शिरा, सैन्यात शिरा!ध्रु.

भूदली, नौदली, वायुदली वा
मिळेल तेथे प्रवेश घ्या
रणविद्या आत्मसात करण्या तुम्हि यत्नांची शर्थ करा!१

शस्त्रसज्ज व्हा, युद्धसिद्ध व्हा
मातृभूमिचे खड्गहस्त व्हा
नेत्र आपुले ठेवुन उघडे - अत्र तत्र संचार करा!२

राष्ट्रा अपुल्या समर्थ करण्या
क्षात्रवृत्ति अंगात बाणण्या
उचला बंदुक, सुयोग्य वेळी, टोक तिचे उलटेच करा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

मन्दिर खुलता.

रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत त्यांनी मोलाचं समाजकार्य केलं. पतित पावन मंदिराची उभारणी केल्याने परमेश्वराची पतित पावन ही पदवीच सार्थ झाली हे मंदिर अस्पृश्यांना खुलं झालं आणि त्या निमित्तानं एक स्वप्न साकार झालं. युगायुगाचं सुतक फिटलं... सारं कसं पवित्र मंगल झालं.

पतित पावन मंदिर खुलता, मंगल मंगल झाले!ध्रु.

वंदू सगळे आज गणेशा
करि समर्थ तू हिंदू देशा
मनोमनी भक्तांनी जमुनी, विघ्नेशा विनविले!१

सहभोजन सोहळा शोभला
प्रेमरसाने पुरता भिजला
विभिन्न छोट्या जाती विरल्या, राष्ट्र उभे ठाकले!२

धर्म न वसतो उदरि कुणाच्या
नांदतसे तो हृदयी नराच्या
मनामनांच्या जुळता तारा, मंगलगीत स्फुरले!३

युगायुगांचे सुतक संपले
मनि स्नेहाचे दीप उजळले
सखे सोयरे जमले सगळे, दास न कोणी उरले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

हिंदू कोण?

कारागाराच्या भिंतींनी स्वातंत्र्याची भावना बंदिस्त करता येईल का? कारागाराच्या भिंतींनी प्रबल बुद्धिमत्तेला बंधन घालता येईल का? कारागाराच्या उन्मत्त भिंतींना महाकवीची प्रतिभाशक्ती आणि समाजचिंतकाची विचारशक्ती जुमानील काय? शक्य नाही. कधीही शक्य नाही.

आणि म्हणून कारावासानंतरसुद्धा अंदमानच्या कठोर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना साऱ्या हिंदुस्थानला प्रभावित करणारा हिंदुत्वाचा महान मंत्र त्या द्रष्ट्या महर्षीनं दिला -

"आसिंधु-सिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका पितृभूः पुण्यभूःश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः"

 
आसिंधु सिंधुपर्यंत पसरली ही भारतभूमी
जो पुत्र तिचा, जो भक्त तिचा त्या हिंदू मानत मी!ध्रु.

हिंदु शब्द राष्ट्राचा बोधक
नसे मुळी पंथाचा वाचक
संस्कृतिचे जे बंधन कोमल, मृदुल असे रेशमी!१

हा देश रामकृष्णांचा
हा देश प्रतापशिवांचा
हिंदु अस्मिता नसानसातुन, खेळतसे नेहमी!२

मग असु दे पंथहि कुठला
भेदाचा प्रश्नच नुरला
इंद्रधनुच्या रंगासमही, खुलली विविध परींनी!३

राष्ट्राचा पाया जनता
ती जनाजनातिल ममता
एक आचरण एकच चिंतन, एकच ध्येय मनी!४

जरि बोली दिसति अनेक
हृदयांची भाषा एक
इतिहास एक, भूगोल एक, भावैक्य जागते मनी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

Sunday, March 15, 2009

कृतज्ञता.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेचा तो दिवस होता. मरणाच्या सीमेतून पुन्हा जीवनाच्या सीमेवर ती पावले पडत होती. त्यांना भेटण्यास बंदीजनांनी गर्दी करू नये म्हणून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण त्याला न जुमानता एक जमादार पुढ सरसावला आणि त्यानं रानफुलांचा हार स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात घातला अवघी सात फुल होती हारामधे पण, अंतःकरणातल्या असीम आदराचं ते प्रतीक होतं. तो सन्मान सावरकर कधीही विसरले नाहीत.


कंठी रानफुलांचे हार! कानी अमुचा जयजयकार!
जन्मांती नच विस्मरेन हा, हार्दिक हो सत्कार!ध्रु.

स्नेहा आपुल्या हृदी जागविन
आपुलकीचे गीत आळविन
सुगंध मन-गाभारी कोंदे, मानु कसे आभार ?१

आज आठवे भोळी शबरी
दिल्या फळांची चवही न्यारी
हृदय गातसे परमानंदे, गीत होत साकार!२

बंदिगृहाचे दार उघडले
दर्शनार्थ मन वेडे झाले
मुक्त अम्ही परि बद्ध मायभू, दुःख वाटते फार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

Saturday, March 14, 2009

चक्र.


अंदमानच्या अंधेरीत दुर्दैवाच्या भीषण चक्राची करकर चालू होती. निराशेचे काळेकुट्ट ढग मनाला व्यापून, उरतच होते. ज्या आपल्या सर्वसमर्थ बुद्धीनं एखादं राष्ट्र संपन्न व्हावं ती आपली बुद्धी, शरीर अन् मन एखाद्या तेलाच्या घाण्याभोवती निर्बुद्ध फेऱ्या घालत पिचत पडावीत ना ? छे, छे! करून टाकावा या जीवनाचा अंत. अशा विचारांच्या आंदोलनांनी मनात काहूर उठे -


पृथ्वीची गती गोल! सूर्यचंद्रांची गती गोल! या अनंत विश्वात कोलूची गरगर कोण्या झाडाचा पाला!

माणसाचे जीवन-मृत्यूही चक्राकारच! सूर्यचंद्र बिनबोभाट फिरलेच पाहिजेत, मलाही कोलू फिरवलाच पाहिजे, कारण मीही कालचक्राचा घटकच आहे!
जन्मणेच जर नाही माझ्या हातात - तर मीच मला मारावे का म्हणून?

अरे वेड्या मना!
सोड हा अहंकार, एकवट सारे बळ, तुझ्या कोलूची एकच फेरी – ठरेल शत्रुघाती सुदर्शनाची एक फेरी! आत्महत्या करणे म्हणजे शत्रूला साह्य होणे!

कार्य उरलं, अवतार संपला. असे कधी झाले आहे काय? जर जीवन धन्य तरच मरण धन्य! मलाही माझे जीवन धन्य केलेच पाहिजे – स्वातंत्र्यझुंजीतील तुरुंगाचे ठाणे लढवून! हे श्रीरामा! ध्येयासक्ती दे! हनुमंता शक्ती दे, निष्ठा दे! माझ्या अंधा-या जीवनात प्रतापसूर्य उगवू दे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन


कळते न मजसी काही?


अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचे ते दिवस – एखाद्या अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्रीसारखे जात होते. एकदा, त्यातच एक वीज लख् कन् चमकून गेली.

त्यांना बाबा दिसले - त्यांच्या थोरल्या भावानं त्यांना पाहिलं.
- विलायतेला जाताना तात्यांना निरोप देताना कितीतरी आशा भरल्या होत्या उरात आणि आता, तोच आपला तात्या आपल्यासारखाच अंदमानात. बाबांचा ऊर भरून आला. आपल्यासारखंच यालाही कष्टात पिचावं लागणार या कल्पनेनं त्या प्रेमळ भावाला गलबलून आलं नि तो कळवळून म्हणाला –

कळते न काही मजसी, तात्या इथे कसा तू?ध्रु.

दृष्टिभेट अवचित घडली
कल्पना मुळी ना शिवली
पैलतिरा जाण्याआधी, भंगलाच सेतू!१

वनवास ललाटि लिहिला
विजनवास अनुजे वरिला
मातेसम वहिनी सोडुनि, इथे दिसशि का तू!२

अश्रु आवरी रे तात्या
दिसते ते सत्य कि मिथ्या?
जगन्नाथ का हे घडवी? कळत नाहि हेतू!३

आराध्य तूच माझा
आधार एक अमुचा
बाहेर तू न उरता, छळतोच दुःखकेतू!४

हा भास तर नव्हे ना?
दुःस्वप्न कल्पवेना
कळते न काहि मजसी, कारागृही कसा तू?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

ओळखले का मला?


"माई, ओळखलं का मला?" तात्यांचे हे शब्द ऐकून तुरुंगाच्या भिंतीसुद्धा कंपित झाल्या असतील.

दोन जन्मठेपांच्या शिक्षा फर्मावल्यानंतर डोंगरीच्या तुरूंगात, माई भेटायला आल्या होत्या वीर सावरकरांच्या वीरपत्नी भेटायला आल्या होत्या. आपला चार वर्षाचा मुलगा प्रभाकर वारला होता, ते सारं दुःख गिळून ती वीरमाता भेटायला आली होती.

सावरकरांना निरोप दिला तो आशासंपन्न क्षण त्यांना आठवला. त्यावेळी रचलेली सारी स्वप्नं डोळ्यांपुढे तरळून गेली; पण ती सारी भंगली होती. बॅरिस्टरच्या डौलदार पोषाखात जे दिसणार होते ते आज कैद्याच्या पोषाखात समोर होते. जन्माचा साथीदार जन्मठेपांच्या शिक्षा भोगत होता.

दोघाच्यामध्ये तुरुंगाचे गज होते आणि उभी होती दुर्देवाची अभेद्य भिंत.

पण, कणखर मनांना तुरुंगाच्या गजांची आणि दुर्दैवाच्या भिंतींची पर्वा असते थोडीच ? म्हणून तर सहजतेनं तात्या म्हणाले –



ओळखले का मला? माई ओळखले का मला!ध्रु.

वस्त्र पालटे तोच मी परी
दिसु दे मुद्रा तुझी हासरी
हृदयि उसळल्या डोंबावरती शिंपड सुस्मित जला!१

असेल इच्छा दयाघनाची
सरेल ताटातुटी जिवांची
तोवरि असल्या भातुकलीचा मोहच मी सोडिला!२

वंशाचा जरि दीपक विझला
समज धन्य अभिमन्यू ठरला
राष्ट्रप्रपंचासाठी अपुला खेळ स्वये उधळला!३

धीर कोठुनि आला तुजला?
अश्रू एकहि नयनि न दिसला
वीरस्त्री तू आचरणाने धैर्यपाठ शिकविला!४

श्रीकृष्णाते स्मरेन निशिदिनि
बेड्यांचाही ताल धरूनी मी
तारकमंत्रा जपेन बरं का, मंत्र तुझा मानला
ओळखले ना मला? माई ओळखले मी तुला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

नको सुदैवा होउस परते.


ब्रिक्स्टन च्या तुरूंगातून स्वातंत्र्यवीरांना १.७.१९१० रोजी मोरिया बोटीने गुप्तपणे हलविण्यात आलं. सावरकरांच्या मनात विचारांचं वादळ चाललं होतं. सागराचा जसा थांग लागत नव्हता तसा त्यांच्या मनाचाही थांग लागत नव्हता. शेवटी ८ जुलै १९१० ला सावरकरांनी मार्सेलिस बंदराजवळ जगाला स्तंभित करणारी, सागरालासुद्धा विस्मित करणारी उडी मारली. पण दुर्दैव.. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना पकडून पुन्हा त्याच बोटीवर बंद करण्यात आलं.

त्या अपयशानं उरी खिन्नता दाटली. मातृभूमी डोळ्यांसमोर उभी राहिली. स्वातंत्र्याचं स्वप्न क्षणभर तरळलं अन् डोळे पाण्यानं डबडबले. मातृभूमीची क्षमा मागायला हात जोडायचे म्हटलं तरी ते मोकळे नव्हते; बेड्या पडल्या होत्या हातात. त्यांनी मस्तक झुकवलं नि म्हटलं –

क्षमस्व माते, क्षमस्व माते
क्षमा करी गे भारतमाते!ध्रु.

तव मोक्षाच्या धरूनी ध्यासा
प्रवर्तलो करण्यास साहसा
हाय परंतू दैव उलटले
बंधनात कर गुंतत माते!१

शिवरायाला मिळे उजळ यश
भाळी माझ्या का गे अपयश ?
युयुत्सु मन हे अता उळमळे –
पदांखालची धरती हलते!२

वैनतेय होण्यास निघालो
छिन्नपक्ष परि जटायु झालो
वंदनासही कर न मोकळे –
त्यास्तव मस्तक माझे झुकते!३

दुस्तर तम सरणार कधी हा?
प्रश्न ठाकतो मम चित्ती हा
उदंड कष्टा साहिन सौख्ये
नको सुदैवा होउस परते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

Thursday, March 5, 2009

घ्या मित्रांनो रामराम.


१३.३.१९१० रोजी वीर सावरकरांना अटक करण्यात आलं. राजद्रोह आणि खुनास मदत असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया स्टेशनवर एक फरारी आरोपी म्हणून त्यांना ब्रिटिश सरकारनं ताब्यात घेतलं. सिंहच पिंज-यात सापडला. शत्रूच्या ताब्यात सापडल्यावर भवितव्य ठरलेलंच होतं. हाल, यातना, कठोरातील कठोर शासन, मनस्ताप, दुःख यांची न संपणारी चक्र आता त्यांच्या मागे सुरु होणार होती. क्षणाक्षणाला ती पोलादी पकड घट्ट होत होती अन आशा मावळत होत्या.

पण तेजाच्या उपासकाला निराशेचा अंधार कधीच माहीत नसतो. अशाही अवस्थेत ब्रिक्स्टनच्या तुरुंगातून आपल्या मित्रांचा निरोप घेतला. त्या पत्रातला प्रत्येक शब्द आशावादाच्या तेजात न्हालेला होता. ते म्हणतात -

प्रत्येकाची ठरे भूमिका
त्यासाठी हा विरह असे का?
दिली भूमिका उत्तम वठवू असू, नसू राहूहि अनाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!१

इतिहासाच्या रंगमंदिरी
असंख्य पात्रे जमली सारी
कृतज्ञ प्रेक्षक करतिल कौतुक, ध्वनि कानी स्वीकरू प्रणाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!२

काळ पाहतो सत्वपरीक्षा
पडतिल विजनी अस्थीरक्षा
स्वतंत्र भारत वृत्त ऐकता, त्या तेजाचे ठरतील धाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!३

मेघपटल हे नच नित्याचे
गगन कोंदले उजळायाचे
धगधगत्या स्वातंत्र्यरवीस्तव, नित्य तयाचे घेऊ नाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

पत्रोत्तर.

सतीचं वाण घेतलेल्या सावरकर कुटुंबाविरुद्ध ब्रिटिश सरकारच उभं राहिलं होतं... आणि त्याचा परिणाम म्हणजे, सावरकरांचे थोरले भाऊ गणेशपंत सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. धाकटे भाऊ नारायणराव सावरकर यांना अटकेत ठेवण्यात आलं... आणि तात्यांच्या भोवतीही परदेशात सुडाचं चक्र गरगरत होतं.

अशा परिस्थितीत येसू वहिनींची स्थिती काय झाली असेल? ती मनस्थिती तात्यांनी जाणली; डोळ्यातील आसवं सावरीतच पत्र लिहायला घेतलं –


पत्र तुझे पावले, वत्सले, वहिनी तुज वंदिले!ध्रु.

अग्रज माझा विजनी गेला
अनुज असा बाहेर राहिला
रामाविण जानकी एकली, ढाळत अश्रूफुले!१

वंश धन्य जाहला जाहला
देशकार्यि वठताना फुलला
धन्य पुष्प जे गजेंद्रराये, हरिचरणी वाहिले!२

तू धैर्याची सोज्वळ मूर्ती
तूच माझि गे पावन स्फूर्ती
सेवाव्रत आश्रया तव तनी, येउनिया राहिले!३

सांत्वन कैसे करू प्रेमले?
जे सुचले ते पत्री लिहिले
त्यागमयी आराध्यदेवते, कर माझे जुळले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

सागरास.

मदनलाल धिंग्राच्या क्रांतीकृत्यानंतर सावरकरांना इंग्लंडमध्ये फार त्रास सहन करावा लागला आणि त्यातच भारतभूच्या विरहाचं दुःख. अशाच एका विषण्ण मनस्थितीत सावरकर ब्रायटनच्या सागरतीरावर उभे होते. छे एक महाकवी उभा होता. महाकवीच्या महान अंतःकरणातील भावनांचं आंदोलन महासागराशिवाय कोणाला समजणार? सागराच्या किनाऱ्यावर लाटा उचंबळत होत्या.. आदळत होत्या.. आणि इकडे मनाच्या काठावर देशप्रेमाच्या, स्वातंत्र्य भक्तीच्या लाटा उचंबळत होत्या.  

सावरकरांनी सागराला साद घातली - सागरा तुजसि विनवितो


सागरा तुजसि विनवितो,
ने परतुनि भारतभूला!ध्रु. 

लाटा किती खळखळ करती
तीरावर येउनि फुटती
बनुनी फेन परतुनि जाती
सागरा प्राण तळमळला!१

मज शब्द एक वदवेना
मातृभूविरह सहवेना
अश्रुसरी या मुळि न थांबती
शोकाग्नि चित्ति भडकविला!२

का निर्दय होउन हसशी?
उद्दामपणे खिजवीशी
तू ऐकले न जर, याच क्षणी-
मी कथिन अगस्ति मुनीला!३

आठव श्रीरामशराते
आठव ऋषि आचमनाते
मत्प्रिय बंधो, करुणासिंधो
चल घेउनि माहेराला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

धन्य ते हौतात्म्य.


इंग्लंडमध्ये सावरकरांचं अभ्यासाबरोबरच क्रांतिकार्यही चालू होतं. त्यांच्या स्फुर्तीच्या स्फुल्लिंगानं मदनलाल धिंग्रा या क्रांतिवीराचं अंतःकरण प्रदिप्त झालं. त्यानं कर्झन वायली या एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला.

१७ ऑगस्ट १९०९. तो क्रांतिकारक फाशीची शिक्षा स्वीकारित होता.. तीही हसत हसत. तो आता कुणालाही दिसणार नव्हता. पण, अज्ञाताच्या पडद्याआड जातानाचे त्याचे शब्द? ते मात्र चिरंतन राहतील -


वन्दे मातरम् । वन्दे मातरम् ।

स्वाभिमान हा आमुचा जागृत
देशभक्तिचे प्यालो अमृत
शिर तळहाती घेउनि लढणे पूर्ण कळतसे कोऽहम्!१

बुद्ध्या आम्हा असे डिवचता
क्रोधाग्नी मस्तका पोचता
सूड अल्पसा म्हणूनि सांडले भूवरि रुधिरार्घ्यम्!२

युध्यमान परतंत्र राष्ट्रनित
हौतात्म्यच उरतसे एक व्रत
भाग्यवंत मी, "राष्ट्रहितार्थम् प्राप्तं मे मरणम्!३

पुन:पुन्हा जन्माते यावे
देशास्तव प्राणां होमावे
दयाघना रे ऐक प्रार्थना प्रसीद दयाळो त्वम्!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

जागृती.


इंग्लंडमध्ये गेल्यावर इंडिया हाऊस' मध्ये सावरकरांचं भाषण झालं. इंडिया हाऊस मध्ये भारतातून, उच्च शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी रहात, त्‍यांना मोठ्या तळमळीनं सावरकर म्हणाले..


रे हिंदवासियांनो । राष्ट्रार्थ नित्य जागा
राहूनियाच सिद्ध, करण्या असीम त्यागा!ध्रु.

जरि वज्र कोसळे हो
धृतिही अभंग राहो
होवो कितीहि हानी शब्दास नित्य जागा!१

शस्त्रास्त्र ज्ञान मिळवा
ती क्षात्रवृत्ती भिनवा
जाणूनि क्रांति सूत्र शिस्तीत सर्व वागा!२

भवितव्यता बलिष्ठा
कर्मी असोच निष्ठा
कतृत्व दाखवूनी सोडाच सर्व संगा!३

एकात्म राष्ट्र होवो
जगि श्रेष्ठताच मिळवो
लाभो प्रसाद हाच, देवास हेच मागा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

Tuesday, March 3, 2009

निरोप.


मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर विलायतेला निघाले होते. 'शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. जणू शिवरायांचा आशीर्वादच त्यांना मिळाला. शत्रूच्या शिबिरात निघालेल्या वीराला जणू तो वरदहस्तच होता.

९ जून १९०६. पर्शिया बोटीनं मुंबईचा समुद्रकिनारा सोडला. मातृभूमीच्या निरोपाच्या क्षणी त्या भक्ताचे मन भारावलं.. हेलावलं. दूर दूर जाणाऱ्या किनाऱ्याकडे पहात हात जोडले गेले नि ओठी शब्द उमटले.

मातृभूमि, नेत्र भरुनि तुजसि पाहु दे ..

 
मातृभूमि, नेत्र भरुनि तुजसि पाहु दे !
विरह सोसण्यास, चित्त वज्र होऊ दे!ध्रु.

तुजला करण्या स्वतंत्र,
शस्त्रयुद्ध हेच तंत्र
शत्रूच्या शिबिरि मला - स्वयेच जाऊ दे!१

द्रव्य ते हवे कशास?
लोभ क्षुद्र नच मनास
त्वत्कारणि देह पडो हेच भाग्य दे!२

निर्मू अभिनव भारत,
ध्येयवेड हे सांप्रत
कर्तव्यपालना कठोर आत्मशक्ति दे!३

कर जुळले, शिर झुकले
उधळत मी शब्दफुले
शब्दांना खड्गाची धार येऊ दे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

स्वत्वाची ज्योत.


१९०५ सालची गोष्ट. विदेशी मालावरील बहिष्काराची कल्पना टिळकांच्या चतुःसूत्रीपैकी एक होती. परदेशी मालाची होळी करण्‍याचं सावरकरांनी ठरवलं.. झालं गाडाभर परदेशी कपडे गोळा करण्यात आले. मोठी मिरवणूक निघाली. महाविद्यालयातील विद्यार्थी, थोर, पोर सारे या होळीला आले होते. लोकमान्य टिळक तर मिरवणुकीत अग्रभागीच होते. नंतर झालेल्या सभेला वक्ते लाभले होते काळ कर्ते शिवरामपंत परांजपे.

होळी आली होती ती सुद्धा विजयादशमीचा मुहूर्त साधून.


होळी आली रे आली रे होळी आली
विजयादशमीचा मुहूर्त साधुन वेगे धावत आली!ध्रु.

विद्यार्थी उत्साहे जमले
जय भारत हे गर्जन चाले
आशा आकांक्षा उधळित ही, स्फूर्तीची गंगोत्री आली!१

विलायती वस्त्रांनी गाडा –
भरला, सगळे नेटे ओढा
लाचारीते, षंढपणाते, निपटण्यास जी उत्सुक झाली!२

लोकमान्यसम लाभे नेता
परांजप्यांसम विजयी वक्ता
छात्रांचा उत्साह वाढवित, मिरवणूक ही पुढे निघाली!३

विलायती कपड्यांची होळी
देशभक्ति पुरणाची पोळी
ज्वाला भिडती आभाळाते - परचक्रा जाळाया आली!४

स्वत्वाची जी ज्योत पेटली,
प्रत्येकाच्या मनी जागली
मनामनांच्या छेडित तारा, हर्षभराने लहरत आली!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

मित्रमेळा.


प्लेगच्या संकटानंतर सावरकर कुटुंब नाशिकला आलं. 
भारतभूच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी तात्यांना ग्रासलं होतं. 

नाशिकला त्यांना आपल्या विचारांचे आबा दरेकर, म्हसकर, पागे हेही मिळाले. सारा मित्रमेळा जनजागृतीसाठी, स्वातंत्र्यासाठी सिद्ध झाला. 

मित्रमेळा? अभिनव भारताची गंगोत्री होती ती. एका दिलाचे, एका ध्येयाचे मित्र एका सुरात म्हणू लागले..



सजला मित्रमेळा! जनजागृतीच्या कार्याला सजला मित्रमेळा!ध्रु. 

स्वातंत्र्य हाच ध्यास, स्वातंत्र्य हीच आस
आशा फुलावयाला, सजला मित्रमेळा!१

शिवराय नित्य ध्याऊ, शिवराय नित्य गाऊ
चैतन्य द्यावयाला, सजला मित्रमेळा!२

व्रत घ्यायचे स्वदेशी, भक्ती असो स्वदेशी
स्वत्वास निर्मिण्याला - सजला मित्रमेळा!३

जातीयता सरावी, राष्ट्रीयता भरावी
जनतेस भारण्याला, सजला मित्रमेळा!४

सूचकता साधन अपुले, दास्यमुक्ती साध्यच ठरले
पुरुषार्थ प्रेरण्याला, सजला मित्रमेळा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

प्लेगाचे थैमान.


प्लेगचा वणवा भगूरपर्यंत येऊन पोहोचला, सारा गाव मृत्यूच्या काळ्याकुट्ट छायेनं व्यापला होता. यमराजाच्या यज्ञसत्रात एक एक आहुती पडू लागल्या. त्यातून सावरकरांचं घर तरी कसं सुटावं?

प्लेगामुळेच झाले, घर निर्मनुष्य सारे
पसरेच मृत्युछाया-भयग्रस्त मात्र सारे!ध्रु.

द्या हो कुणी कुठूनी, मज एक घोट पाणी
अण्णास वात झाला - वास्तु कशी थरारे!१

एकेक घास मृत्यू, लागे मजेत खाऊ
रडणे सुचे न कोणा, कोंदाटलेत वारे!२

आक्रंदतात कुत्री, यमराजयज्ञसत्री
प्लेगास सर्व रुचले - अबला नि सान पोरे!३

ती नित्य पेटलेली, सरणे कधी न विझली
या देहि याच डोळा, मृत्यूस देखिले रे!४

काहीच की सुचेना, शब्दात सांगवेना
कल्पांत मांडलेला, बसलो पहात सारे!५

संहार संपवोनी, फिरवी मुखावरुनी
ती जीभ काळव्याघ्र - तृप्तीत गुरगुरे रे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

ऐक ऐक रे पोरा.


चापेकरांच्या हौतात्म्यानं विनायकाच्या बालमनावर फार खोल ठसा उमटला आणि आपल्या अष्टभुजेसमोर आता तर प्रतिज्ञाबद्ध झाला होता तो.

शस्त्रसिद्ध आणि शास्त्रशुद्ध क्रांतीची चाहूल अण्णांच्या विनायकाच्या वडिलांच्या कानावर गेली. ते गहिवरले, त्यांच्या डोळ्यात आसवं आली. ते अश्रू आईचे आणि वडिलांचेही होते. कळकळून ते म्हणाले -
"ऐक चिमुकल्या तात्या माझे, ऐक ऐक रे पोरा"


ऐक चिमुकल्या तात्या माझे,
ऐक ऐक रे पोरा ।॥धु।।
लहान तू तव शरिरहि कोमल
वत्सा रे सुकुमारा!१

अनुसरशी तो मार्ग भयंकर
लपली विघ्ने किति दारुणतर
सहन सर्व हे करशिल कैसे?
बदल बदल तव मोहरा!२

तुझ्याच एका खांबावरती
नगरि द्वारका उभी असे ती
तुजवरती सकलांच्या
आशा तू सर्वांचा प्यारा!३

नाद भयंकर जरि न सोडिशी
सकलांवर संकटे आणिशी
अधिक काय बोलू रे बाळा –
नयनांपुढे तमिस्त्रा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

Saturday, February 28, 2009

चाफ्याची फुले.


पुण्यात त्यावेळी दोन यमदूतांनी थैमान घातलं होतं. एक यमदूत होता प्लेग आणि दुसरा रँडसाहेब.

चापेकरांनी रँडसाहेबाचा बळी घेतला. परिणाम व्हायचा तोच झाला. १८ एप्रिल १८९८ त्यादिवशी सकाळी दामोदर चापेकरांना फाशी देण्यात आली - केसरीतील ती वार्ता बालविनायक वाचत होता. केसरीचा अंक अश्रूंनी भिजून गेला - तरी वाचन संपलच नव्हतं.

बालविनायक भारावून गेला. उठला नि अष्टभुजा देवीसमोर जाऊन बसला. हात जोडले... डोळे मिटले.

वधस्तंभाची वाटचाल करणारे चापेकर त्याला दिसू लागले. अष्टभुजा देवीच्या ठिकाणी स्वातंत्र्यलक्ष्मी, साकार झाली, त्या तेजस्वी मूर्तीच्या पावलांवर त्याला फुलं दिसू लागली... चाफ्याची हसरी फुलं दिसू लागली. चाफ्याची फुलं? छे क्रांतिकारक चापेकरांची शिरकमलं होती ती. तो पुटपुटला.

 
अलगद पडली तव चरणांवर चाफ्याची ही फुले
ती तर, हसरी शिरकमले!ध्रु.

अश्रू नयनी संतत येती
संतापे परि मुठी वळताती
स्वतंत्रतेच्या यज्ञाचे तर होमकुंड पेटले!१

एक करिन ही धरती अंबर
घण घालिन गे परसत्तेवर
सूड रिपुचा पुरा घ्यावया, मन माझे चेतले!२

मारित मारित वरेन मरणा
स्वातंत्र्यास्तव घेइन जनना
शत्रुंजयवृत्ती तर माझ्या तनातुनी उसळे!३

अष्टभुजे तुज ठेवुनि साक्षी
उच्चारित मी आज प्रणासी
मेलो तर हौतात्म्य लाभते, श्रेय जरी नच मिळे!४

का न चालवू मी कार्या ते?
का न स्वीकरू सती व्रताते
सशस्त्र युद्धी सैनिक होता करिन धन्य आयु सगळे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

माता आम्हा मिळाली.


"ठेविन पायि, डोई, दे गं घरास आई" बालविनायकानं अष्टभुजेपुढे केलेलं मागणं तिन ऐकलं. त्याच्‍या थोरल्या भावाचं - बाबारावांचं लग्न झालं. घराला लक्ष्मी मिळाली., बालविनायकाला वहिनी मिळाली - जणू आईच मिळाली. 
आनंदातिशयानं तो म्हणाला,

"वहिनी घरात आली, माता अम्हा मिळाली"


वहिनी घरात आली, लक्ष्मी घरात आली
माता अम्हा मिळाली!ध्रु.

वहिनी प्रसन्न दिसते, गालात हासु फुटते
सौभाग्य परत आले, लक्ष्मी घरात आली!१

मी भांडणार नाही, देवी तुझी कृपाही
तू ऐकलेस माझे – भक्ती न व्यर्थ ठरली!२

वात्सल्य आज आले, पावित्र्य प्राप्त झाले
बाबा कृतार्थ होई, गंगा घरास आली!३

स्पर्शात मातृमाया, लाभे घरास छाया
दुःखातपा हराया, होऊन छत्र आली!४

खेळू आम्ही तिच्याशी, मिळतील सौख्यराशी
लाभे पुन्हा जिव्हाळा, वहिनी घरात आली!५

वहिनीस पाहताना, हसतात गोड अण्णा
ते जोडतात हात - देवी प्रसन्न झाली!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

Wednesday, February 25, 2009

गेली निघून आई.


अष्टभुजा घरी आली आणि बालविनायकाला एक स्वप्न पडले. त्यानं ते आपल्या आईला सांगितलं, "आई, माझ्या स्वप्नात देवी आली अन् म्हणाली, 'मला तुझा बळी हवाय"

आईच्या मनावर वज्राघातच झाला. ती देवापुढे बसली. काकुळतीने म्हणाली, "हा माझा गोजिरवाणा गोळा का मागतेस? देवी, देवी अष्टभुजे भवानी देवी, माझा बळी घे, माझा बळी घे"

आईने पुढचं नवरात्र काही पाहिलं नाही. मध्यरात्र झाली होती. अंधार दाटला होता. बालविनायक अष्टभुजेपुढे बसला होता; स्फुंदत होता. विश्वजननीला सांगत होता, "देवी तुझ्यापुढे गे, मी बैसलो कधीचा तव निर्विकार मुद्रा, का गे कठोर होई? - गेली निघून आई । "

 
देवी तुझ्यापुढे गे, मी बैसलो कधीचा
तव निर्विकार मुद्रा, का गे कठोर होई?
- गेली निघून आई !ध्रु.

का घेतला बळी तू ?
तव काय सांग हेतु
जाता सुवासिनी ती लक्ष्मी निघून जाई!१

ते स्फुंदतात बापू
देवी नकोस कोपू
पिल्लांस सोडण्याची राधेस का गं घाई?२

सौभाग्य ते निमाले
निस्तेज धाम झाले
छाया अमंगलाची भिववीत मात्र राही!३

आई तुझ्या विना गे
काही न गोड लागे
काळोख दाटलाहे - ओसाडल्या दिशाही!४

हव्यास जर बळीचा –
का घेतला न माझा?
माझा बळी सुखे घे, दे तू घरास आई
ठेवीन पायि डोई - दे गं घरास आई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

Thursday, February 19, 2009

कुलस्वामिनी आली.


किती पवित्र दिवस होता तो. सावरकरांची आराध्यदेवता, अष्टभुजा भवानी देवी आज येत होती. त्यांची कुलस्वामिनी घरी येत होती - शक्तिदायिनी घरी येत होती.

बालविनायकाच्या भावनांना भरतं आलं होतं. झांजांचा झणत्कार झाला, ताशेवाजंत्र्यांची झुंबड उडाली. गुलाल उधळला नि दीप उजळले. शिंगाची ललकारी घुमली आणि त्या निनादात कुलस्वामिनी आली- अष्टभुजा घरी आली.


शिंगाची ललकारी घुमली कुलस्वामिनी आली,
अष्टभुजा घरी आली!ध्रु

सृष्टी हिरवा शालू ल्याली, आमराई ही प्रसन्न हसली
शिंग ऐकता बाहु स्फुरती, उतरे नेत्री लाली!१

अंगांगी चैतन्य संचरे, पूर्वकालि मनविहंग विहरे
झांज झणझणे, घुमत चौघडा, मन रंगे वैभवकाली!२

सीमा सगळ्या उल्लंघाव्‍या, अश्वांच्या टापा वाजाव्‍या
रणचंडीचे मिळुनि आवाहन, गर्जत जयमहाकाली!३

दांड्यांची व्हावीच पालखी, लक्ष्मि रहावी हसत सारखी
येईल का गतवैभव फिरुनी, उत्सुकता आतुरली!४

देवीचा जयघोष चालला, स्मृति सुगंध चित्तात कोंदला
चित्र जसेच्या तसे राहिले, नित्याचे हृत्पटली!५

भवानि माते शस्त्रधारिणी, अयि दुर्गे तू अभयदायिनी
दे तव शौर्या, अतुलहि धैर्या - सांप्रत संकटकाली!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

सुर्यकुलाशी नाते.


"आत्मार्पण तव विस्मित करते, जीवन धन्य नि मृत्यु महान"

सूर्यकुलात जन्म घेणा-या प्रत्येक तेजस्वी वीरपुत्राचं जीवन अंगाराच्या कणासारखं धगधगतं, जळत असतं - संकटांनी भरलेलं असतं.

वासुदेव बळवंत फडके. असाच एक धगधगता अग्निकण. एडनच्या तुरूंगात त्यांनी हौतात्म्य पत्करलं.

पण क्रांतीची ज्योत कधी विझते का? एका ज्योतीनं दुसरी ज्योत लागते. एक अखंड परंपरा, तेजस्वी, दिव्य परंपरा आहे ही.

वासुदेव बळवंत फडके गेले आणि तीनच महिन्यांनी विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला. सूर्यकुलात एक नवी ठिणगी प्रकाशू लागली... धगधगू लागली. दैवाशी लढू लागली.


जो वंश जोडतो सूर्यकुलाशी नाते
त्या वेलीच्या फुलाफुलाला दैवाशी लढणे असते!ध्रु.

जीवनयज्ञाची ज्वाळा क्षणात भिडते आभाळा
स्वये होउनी पवित्र समिधा अग्नीते आलिंगन देते!१

रथचक्राते उद्धरिणे मृत्यूला प्रतिपल हसणे
शापित जीवन असले तरिही स्थण्डिलि अजुनी धगधगते!२

बुद्ध्या वरणे असिधाराव्रत इतिहासाची धरणे संगत
तडित् चमकुनी असंख्य नेत्रां - क्षणात दिपवुनि ती जाते!३

"क्रांतिवीर" हो जधि अस्तंगत दुसरा जन्मे होउन प्रेरित
परंपरा ही दिव्यत्वाची खंडित ना कधि होते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

Sunday, February 15, 2009

अर्घ्य


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन. सागर, आकाश यांची उपमानं थिटी पडावीत असं ते विशाल जीवन. मृताला संजीवन देणारं वक्तृत्व, महाकवी कालिदासाशी स्पर्धा करणारी प्रतिभा, आर्य चाणक्यासारखी राजनीतिज्ञता, हिमाचलासारखं उत्तुंग व स्थिर ध्येयवादित्व, मेरु पर्वतासारखं अविकंपित धैर्य, अद्भुत काव्याला सुद्धा अद्भुत वाटावं असं साहस नि धैर्य, राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक अंगाच्या उभारणीसंबंधी मार्गदर्शन करणारी क्रांतदर्शी प्रतिभा, द्रष्टेपणा, महायोग्याचा संयम आणि.... आणि रोमांच उत्पन्न करणारं हौतात्म्य. असं ते तेजस्वी जीवन, त्या तेजांनं डोळे दिपतात, मस्तक झुकतं नी आपण आदरानं म्हणतो "हिंदुहृदयसम्राट सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर". होय, शिवाय स्वातंत्र्यरवी सावरकर त्या स्वातंत्र्यवीराला अर्घ्य देऊया.


स्वतंत्रतेच्या वीरा, तुजसी कोटि प्रणाम,
तुज कोटि प्रणाम ।। धु.।।

तू तेजस्वी, मार्तण्डासम
बलसागर त् वायुसुतोपम
मृत्युंजय वीरा, भास्वरा विनम्र होती किती अनाम!१

ज्वलंत ज्वालामुखी भासशी
रणसिद्धान्ता ठाम मांडशी
सोनेरी पानांच्या द्रष्ट्या, जरि झालासी तू बदनाम!२

तुझिया देशी तुझी उपेक्षा
तुवा न धरली एक अपेक्षा
तू निरीच्छ, तू दधीचि दुसरा आणु कोठुनि तुज उपमान!३

तू कर्णाहुनि उदार दाता
लाजविले मृत्युला मरता
आत्मार्पण तव विस्मित करिते जीवन धन्य नि मृत्यु महान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

काव्यमय सावरकर-दर्शन

१९६८ साली माझ्या वडीलांनी काव्यमय सावरकर दर्शन हे काव्य लिहिले व प्रकाशित ही केले. त्याकाळी त्यांनी त्याचे कार्यक्रमही केले, ते स्वतः आणि रंजना गोखले गात व निवेदनाला श्री श्री वा कुलकर्णी असायचे सावरकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या ब्लॉग वर हे काव्य पुन्हा प्रस्तुत करत आहे