तीर्थरूप बाबा - तात्यांचे थोरले भाऊ इहलोकीची यात्रा संपवून चालले होते. मृत्यू ज्यांच्या जीवनाचा सोबती होता. मृत्यू म्हणजे सुंदर होणं अशी ज्यांची दृष्टी, असे बाबा सांगली येथे मृत्युशय्येवर होते. जो जीवनवीर मृत्यूला सामोरा चालला होता; त्यांना तात्यांनी पत्र पाठवलं ते असं
"या आपल्यासारख्या सतत साठ वर्ष लढत असलेल्या वीराची काया जो पडेल ती मानवी काया नव्हे तर देवाच्या हातच्या वज्राची एक महान दिव्य समीधाच होय” असे उद्गार काढून हात जोडून वंदन करीत तात्या पुढं म्हणाले –
तीर्थरूप बाबा, पुढती सुखेनैव जा
जीर्णकुडी त्यजुनी, सुंदर व्हावयास जा!ध्रु.
कृतज्ञता मानसि दाटे
धन्यताहि मोठी वाटे
आप्त स्वकिय पुनरपि दिसले, दुःख हो वजा!१
आव्हान कितीदा दिधले
मृत्यूला हसत खिजविले
मैत्रीस्तव त्याच्या हर्षे, योगिराज, जा!२
सुखदुःखे आली गेली
समवृत्ती चित्ती धरली
पद्मपत्र जीवन ठरले, स्थितप्रज्ञ, जा!३
क्रांतिध्वज हाती धरला
तो कधी न किंचित ढळला
जन्मभरी झुंजत होता, तृप्तकाम, जा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment