१९०५ सालची गोष्ट. विदेशी मालावरील बहिष्काराची कल्पना टिळकांच्या चतुःसूत्रीपैकी एक होती. परदेशी मालाची होळी करण्याचं सावरकरांनी ठरवलं.. झालं गाडाभर परदेशी कपडे गोळा करण्यात आले. मोठी मिरवणूक निघाली. महाविद्यालयातील विद्यार्थी, थोर, पोर सारे या होळीला आले होते. लोकमान्य टिळक तर मिरवणुकीत अग्रभागीच होते. नंतर झालेल्या सभेला वक्ते लाभले होते काळ कर्ते शिवरामपंत परांजपे.
होळी आली होती ती सुद्धा विजयादशमीचा मुहूर्त साधून.
होळी आली रे आली रे होळी आली
विजयादशमीचा मुहूर्त साधुन वेगे धावत आली!ध्रु.
विद्यार्थी उत्साहे जमले
जय भारत हे गर्जन चाले
आशा आकांक्षा उधळित ही, स्फूर्तीची गंगोत्री आली!१
विलायती वस्त्रांनी गाडा –
भरला, सगळे नेटे ओढा
लाचारीते, षंढपणाते, निपटण्यास जी उत्सुक झाली!२
लोकमान्यसम लाभे नेता
परांजप्यांसम विजयी वक्ता
छात्रांचा उत्साह वाढवित, मिरवणूक ही पुढे निघाली!३
विलायती कपड्यांची होळी
देशभक्ति पुरणाची पोळी
ज्वाला भिडती आभाळाते - परचक्रा जाळाया आली!४
स्वत्वाची जी ज्योत पेटली,
प्रत्येकाच्या मनी जागली
मनामनांच्या छेडित तारा, हर्षभराने लहरत आली!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
🙏🙏🙏
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete